'मोगर्याचा गजरा'
बाॅसने
निघता निघता दिलेली फाईल त्याने कंप्लिट केली... नी घड्याळाकडे बघतच तो
ऊठला... ते घड्याळाचे काटे त्याला बाभळीच्या काट्यांसारखे टोचले होते...
छोटा काटा नऊवर नी मोठा दोन वर. "च्यायला दोन तास खाल्ले की आपले ह्या
फाईलने"... असं तोंडातल्या तोंडात पुटपूटत, नी बाॅसला मनातल्या मनात
लाखोल्या वहात... तो एकदाचा आॅफिसच्या बाहेर पडला. फोर्टहून भराभर चालतच तो
cst ला पोहोचला... ९:३५ च्या खोपोली फास्टमध्ये लोटून दिलं त्याने
स्वतःला.
"ही
जेवणार नाही आपण गेल्याशिवाय... हजारवेळा सांगितलं हिला, की आता तू दोन
जिवांची आहेस... अशी ताटकळत थांबू नकोस माझ्यासाठी... पण ही ऐकेल तर शप्पथ
ना... त्यामुळेच असं अचानक काही काम लागून ऊशिर झाला, तर मिळेल ती ट्रेन
पकडावीच लागते... कितीही त्रास होवो". तासाभराने ठाण्याला ऊतरुन, घराकडे
चालत असलेल्या त्याचं स्वगत चालूच होतं... की एका मुलीने त्याचा रस्ता
अडवला. त्या मुलीच्या हातात एक टोपली होती नी त्या टोपलीत एकच गजरा...
'मोगर्याचा गजरा'. त्याचा हात आपसुकच गेला खिशाकडे, नी त्याने दहा रुपये
काढून तिच्या हातावर ठेवले. तो शेवटचा एकच ऊरलेला गजरा आपल्याला मिळाला,
म्हणून प्रचंड खूष झाला होता तो.
घरी
आल्या आल्या त्याची वाट बघत असलेल्या, त्याच्या बायकोच्या केसांत माळला
त्याने तो गजरा. गजरा माळून तो वळतो ना वळतो, तोच त्याची बायको ओरडली
जोरातच... त्यांच्या बाळाने पहिल्यांदाच लाथ मारली होती पोटातून तिच्या.
त्यानेही मग हात धरत तिच्या पोटावर, त्यापुढची लाथ अनुभवली. दोघांनाही अपार
आनंद झाला होता... त्यांच्या बाळाने चक्क हालचाल केली होती या गोष्टीचा.
दिवस भरायला अवघा पाऊण महिना शिल्लक होता, तरिही बाळाची काहिच हालचाल जाणवत
नव्हती... सोनोग्राफीत हृदयाचे ठोके तर येत होते पुसटसे... पण बाकी हालचाल
अगदीच शुन्य. डाॅक्टरनी सांगितलं होतं दोघांनाही की, "जर का येत्या दोन
दिवसांत नाहिच जाणवली हालचाल... तर आपल्याला तातडीने आॅपरेशन करुन बाळाला
जन्म द्यावा लागेल... कारण आईच्या जिवाला धोका संभावू शकतो जर का ह्यात वेळ
गेला... आणि ते जन्मलेलं बाळ कसं निपजेल, ते ही सांगता येणं कठिणेय".
दोघेही या अशा प्रचंड मानसिक दडपणाखाली असतांनाच, आज हा प्रकार घडला होता.
मग ती रात्र दोघांनीही जागतच काढली होती आनंदात... भरलेल्या डोळ्यांनी बघत,
आसुसलेल्या स्पर्शांनी अनुभवत... बाळाच्या होणार्या हालचाली तिच्या
पोटातून.
दुसर्या
दिवशी तो शीळ मारतच निघाला आॅफिसातून, ठरवूनच की आज त्या मुलीकडून पुन्हा
गजरा घ्यायचा... तिचे आभार ही मानायचे, की तिच्या गजर्यामुळेच त्यांचं जवळ
जवळ निर्जिव झालेलं बाळ पुन्हा अॅक्टिव्ह झालं. काल त्याला जिथे ती मुलगी
दिसलेली, तिथे तो आला... पण ती मुलगी काही दिसली नव्हती त्याला. तिन - चार
दिवस झाले होते, तो रोज ठरवून त्या मुलीला शोधे... पण ती त्याला अद्यापही
दिसली नव्हती. दरम्यान डाॅक्टरांकडून तपासणी करुन घेतली होती त्याने
बायकोची... आणि डाॅक्टरही अचंबीत झाले होते, अचानकच बाळामध्ये झालेले
पाॅझिटिव्ह चेंजेस बघून.
काल
मात्र तो ठरवूनच ऊतरला ठाण्याला, की आज त्या गजरेवाल्या मुलीला शोधायचंच.
त्याने वाट पाहिली तिची, चौकशी केली तिची... पण अशी कुठलीही गजरे विकणारी
मुलगी तिथे बसत नव्हती, असंच सांगण्यात आलं त्याला. तो प्रचंड हैराण झाला
होता... कासाविस झाला होता. तेवढ्यात तिथे भाजीचा ठेला लावलेल्या एका
सत्तरीच्या मावशींनी, त्याला हाक मारली. तो शोधत असलेल्या मुलीचं वर्णन
विचारलं त्यांनी... ती मुलगी प्रेग्नंट होती हे त्याच्याकडून ऐकल्यावर,
डोळे विस्फारले त्या मावशींचे... आश्चर्याने हात 'आ' वासलेल्या तोंडावर
गेले. "तू बोलतूयास तशी पोरगी पाच वर्सांपुर्वी ईथं गजरे ईकायची... पोटूशी
व्हती... पन एकेदीसी ईथंच यका सायबाच्या गाडीचा धक्का बसला तिला, नी तिचा
पोर पोटामंदीच मेला... पार यडी झाली ती मंग... आनी दोनच दिसांत ऊडी मारली
तिनं गाडी खाली... तिचं पिरेत म्या सोताच्या डोल्यांनी बघितलंय... तिच्या
त्या मेल्या हातात एक मोगर्याचा गजराबी हूता... पन तुला कशी बाय ती दिसली
पाच वर्सांनी पुन्हा?... त्ये बी त्या येकाच गजर्या संगट".
तो
आता पुरता चरकला होता... काहिच सुचत नव्हतं त्याला. त्याचं ऊच्च शिक्षण
त्याला अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला, परावृत्त करत होतं... पण पाच
वर्षांपुर्वीची ती घटना, तो आजही विसरला नव्हता. नुकत्याच लग्न झालेल्या
बायकोला, गाडीतून फिरवायला बाहेर पडला होता तो. दोघं गप्पा मारत, गाणी ऐकत
चाललेले की रस्त्याच्यामध्ये अचानक कुत्र्याचं एक पिल्लू आलं. त्या
पिल्लाला वाचवण्याकरता त्याने एकदम गाडी राईटला मारुन, परत लेफ्टला घेतली
होती... पण तेवढ्या वेळेतच ती धडकली होती कोणालातरी. गोंगाट झाला होता,
गलबला झाला होता रस्त्यावर... त्याने क्षणभरच गाडी थांबवली होती... नी मागे
वळून पाहिल्यावर, त्याला दिसलेला तो रक्ताचा ओघोळ... खाली पडलेल्या
कुणाच्यातरी दोन पायांमधून वाहतांना. त्याच्या प्रचंड घाबरलेल्या बायकोने,
तिथे न थांबता... त्याला गाडी पळवायचा ईशारा केला होता. त्या दिवसापासूनच
गाडी चालवणं सोडलं होतं त्याने. नंतर त्याने चौकशीही केली होती... पण एक
मुलगी फक्त जखमी झाल्याचं कळलं होतं त्याला... त्याने देवाला मनोमन हातही
जोडले होते मग. "म्हणजे ती मुलगी हीच होती... जी मला भेटली चार
दिवसांपुर्वी... जिच्याकडून गजरा घेतीला मी... म्हणजे ती... ती... पाच
वर्षांपुर्वीच मेली होती... कारण तिचं पोटातलं मुल गेलं होतं... ज्याला मीच
कारणीभूत होतो... तरिही तिने... तिने दिलेल्या गजर्यामूळे माझ्या मुलात
नव्याने जिव आला... कसं शक्य आहे हे... असं कसं होऊ शकतं?".
तो
सुन्न होऊन... डोकं गच्च पकडून हा विचार करतच होता, की त्याचं लक्ष समोर
गेलं. समोरच्या फुटपाथवर ती... हो तिच ऊभी होती... त्याच्याकडे बघत... मंद
हासत. आणि तिच्या हातात एक पिल्लू होतं कुत्र्याचं... कदाचीत तेच जे
वाचवण्याकरताच त्याने गाडी... "म्हणजे तिला कळलं असावं, की जे झालं ते
चुकून झालं होतं... आपण बेदरकारपणे गाडी नककीच चालवत नव्हतो... म्हणूनच
तिने माफ केलं असावं का आपल्याला?... जरी आपण थांबलो नव्हतो... पळून गेलो
होतो घाबरुन". हा विचार त्याच्या मनातून येतच होता, की एक बस गेली त्या
दोघांच्या मधून... आणि ती मुलगी नव्हती आता त्या जागेवर. तो त्या जागेवर
गेला... त्याने हात जोडले मनापासून... क्षमा मागितली त्या न होऊ शकलेल्या
आईची... आभारही मानले, त्यांना मोठ्या मनाने माफ केलं तिने म्हणून. आणि
तेवढ्यात त्याचं लक्ष गेलं खाली जमिनीवर... वाकून ऊचलला त्याने 'तो'... ती
ठेऊन गेलेली त्याच्या बायकोसाठी, तिच्या पोटातल्या त्यांच्या बाळासाठी...
शुभ्र चांदण्या ओवल्यासारखा... मंद दर्वळणारा... तो एकच 'मोगर्याचा गजरा'.